मराठी रोखठोक न्युज

(सर्व सामान्यांचा आवाज)

कब्रस्तानच्या हद्दीत गटारास मुस्लिम समाजाचा विरोध काम तात्काळ थांबवून पर्यायी मार्गाने सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी.

दिलीप वाघमारे यांजकडून

लोणंद शहरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या हद्दीतून इंदिरानगर परिसरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटाराचे काम करण्यास मुस्लिम समाजाने तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर काम तात्काळ थांबवून कब्रस्तानच्या सुरक्षा कंपाऊंडच्या हद्दीबाहेरून पर्यायी मार्गाने सांडपाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना सोमवारी (दि. ५) देण्यात आले.

यावेळी लोणंद मुस्लिम जमातचे सचिव सतारभाई काझी, कय्यूमभाई बागवान,विश्वस्त कय्युम मुल्ला, सर्फराज बागवान,बबलुभाई इनामदार, नझीर मुल्ला, अमर आतार, बबलु सय्यद, हुजेफा आतार, तारीक बागवान,जाविद पटेल, शाहरुख कच्छी आदि समाज बांधव बहुसंख्येने उपस्तिथ होते.
लोणंद शहरातील मुस्लिम समाजाचे कब्रस्तान पवित्र दफनभूमी आहे. या कब्रस्तानच्या हद्दीतून इंदिरानगर रहिवासी भागातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व संबंधित ठेकेदारामार्फत गटाराचे काम करण्यात येत असल्याचे समाजाच्या निदर्शनास आले.
सदर कामाच्या पाहणीसाठी स्थानिक नगरसेवक, रहिवासी नागरिक तसेच संबंधित ठेकेदार कब्रस्तानच्या सुरक्षा कंपाऊंडमध्ये आले होते. मात्र, समाजाच्या जबाबदार व्यक्तींनी सदर कामास स्पष्टपणे हरकत नोंदविली.
कब्रस्तानच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे गटार अथवा सांडपाण्याची व्यवस्था करू नये, अशी मुस्लिम समाजाची भूमिका आहे. अशा कामामुळे धार्मिक भावना दुखावून अनावश्यक धार्मिक व सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे सदर काम तात्काळ थांबवून कब्रस्तानच्या सुरक्षा कंपाऊंडच्या हद्दीबाहेरून पर्यायी मार्गाने सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कब्रस्तानच्या जागेत समाजबांधवांच्या धार्मिक भावना दुखावतील असे कोणतेही काम करू नये. अन्यथा प्रशासनाच्या या कृतीचा निषेध नोंदवून संबंधित नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराविरुद्ध नियमानुसार कायदेशीर दाद मागावी लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.लोणंद मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना हे निवेदन देण्यात आले.


मुख्य संपादक = शौकत शेख :———————–

Leave a Reply

Discover more from मराठी रोखठोक न्युज

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading