
प्रभाग ११ मधील धोकादायक उघडे गटार बंदिस्त करा; नागरिकांची मागणी
सखाराम भंडलकर घर ते शिवाजी बोडरे घरादरम्यान गटारावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज
दिलीप वाघमारे यांजकडून
लोणंद : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये सखाराम भंडलकर यांच्या घरापासून शिवाजी बोडरे यांच्या घरापर्यंत असलेले मोठे उघडे गटार नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, हे गटार तातडीने बंदिस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या गटारावर नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी पूल टाकण्यात आले आहेत. मात्र, सद्यस्थितीत हे पूलही योग्य स्थितीत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे संबंधित प्रशासनाने या ठिकाणी असलेले पूल सुस्थितीत करून नागरिकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच शिवाजी बोडरे यांच्या घरापासून पुढे जुन्या शौचालयापर्यंत असलेले गटारही पूर्णपणे बंदिस्त करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. उघड्या गटारामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता तसेच डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर आहे.
प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन पाहणी करावी आणि गटार बंदिस्त करणे, पूल दुरुस्त करणे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच
प्रभाग क्रमांक ११ मध्ये गटारालगत असलेले जुने शौचालय सध्या धोकादायक अवस्थेत असून, त्याचा काही भाग जीर्ण झालेला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या जुन्या व धोकादायक शौचालयाची तातडीने पाहणी करून ते पाडण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मुख्य संपादक =शौकत शेख :————————
Leave a Reply