मराठी रोखठोक न्युज

(सर्व सामान्यांचा आवाज)

नीरा नदीच्या दत्त घाटावर रंगणार हरिनामाचा गजर
दत्तघाटावर ११ दिवसीय कीर्तन महोत्सव व भागवत महोत्सव ;
सोहळा दिवंगत अजित पवार यांना असणार समर्पित.

लोणंद : प्रतिनिधी
      पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीकाठावरील पवित्र श्रीक्षेत्र दत्तघाट येथे १५ मेपासून भव्य “श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दिव्य कीर्तन महोत्सव तसेच श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. खंडाळा, फलटण, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक सोहळा तब्बल ११ दिवस भक्तिरसात रंगणार असून दररोज हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत.
  हा सोहळा स्वर्गीय लोकनेते मा.अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस समर्पित करण्यात आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांसह विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे जात असताना नीरा नदीतील दत्तघाटावर निरास्नानाची परंपरा आहे. त्याच पवित्र भूमीवर आता हरिनामाचा अखंड गजर होणार असल्याने वारकरी संप्रदायातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  दि.१५ ते २५ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या या सप्ताहात पहाटे काकडा आरती, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन सेवा, कीर्तन सेवा आणि श्रीमद् भागवत कथा यांचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. दिलीपजी महाराज झगडे (पाडेगाव) हे भागवत कथा प्रवक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असून ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोकाटे (आळंदी) हे नवविधा भक्ती कथेद्वारे अध्यात्मिक संदेश देणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध भागांतील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, संत-महंत आणि वारकरी संप्रदायातील भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. दिंडी सोहळा, नगर प्रदक्षिणा आणि सामूहिक हरिनाम संकीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंचक्रोशीतील इयत्ता सातवी ते बारावीतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना पालकांसह सहभागी करून संत विचारांची प्रेरणा देण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सोहळ्यादरम्यान भाविकांसाठी भोजन व निवासाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. दिलीप महाराज झगडे, ह.भ.प. दत्तात्रय फरांदे महाराज तसेच आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, शंकरराव मर्दाने, मंगेश धमाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
फोटो : श्रीक्षेत्र दत्तघाटावर होणाऱ्या “श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दिव्य कीर्तन महोत्सव तसेच श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह” सोहळ्याची माहिती देताना मान्यवर.


मुख्य संपादक=शौकत शेख:—————-

Leave a Reply

Discover more from मराठी रोखठोक न्युज

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading